सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:23 PM2022-02-18T19:23:47+5:302022-02-18T19:25:51+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राणे पिता-पुत्रांना टोला लगावला आहे. येत्या काळात जिल्हा बँक राणे समर्थकांचा अड्डा बनू नये, असे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा व यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी निवड केली जाते, असेही ते म्हणाले.
नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार
आमदार नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदानाचा देखील अधिकार नव्हता. थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनवणे हे बँकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये अशी अपेक्षा आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसत असल्यानेच आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.