Maharashtra Politics: “राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:24 IST2022-11-04T15:23:01+5:302022-11-04T15:24:11+5:30
Maharashtra News: अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Maharashtra Politics: “राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका
Maharashtra Politics: आताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या दौऱ्यावर आहेत. यातच सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन केवळ इथले एक सरकार उलथवून लावायचे, लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करायची आणि एक लाट तयार करायची यासाठीच होते. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या गेल्या नाहीत. लोकपाल आंदोलन सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एकहाती सत्ता देण्यावर भर देणारे होते. अर्थात चौकटीच्या बाहेरचे होते, असे सांगत सुषमा अंधारे यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला.
हो, अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली
संवैधानिक चौकटीत सत्ता विकेंद्रिकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्या वर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडकपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत, अशी घणाघाती टीका करताना, अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, अण्णा हजारे लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"