Maharashtra Politics: “वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा....”; सुषमा अंधारेंनी शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:53 PM2023-01-21T15:53:18+5:302023-01-21T15:54:48+5:30
Maharashtra News: सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरत असून, सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली.
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून अद्यापही विरोधकांकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मात्र, ही कामे उद्धव ठाकरे यांनी केली असून, भाजप श्रेय घेत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही मोदींच्या दौऱ्यावर निशाणा साधण्यात आला. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे राज्याचा दौरा करत आहेत. शिंदे गटातील नेते, आमदारांनी केलेल्या टीकेचाही सुषमा अंधारे खरपूस शब्दांत समाचार घेत असतात. यातच आता सुषमा अंधारे यांनी एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा....
सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेला पहिला फोटो जुना आहे. यात नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. सुषमा अंधारे यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करताना ‘हाच तो फरक’ म्हणत बाळासाहेब ठाकरे असताना त्याचं राजकीय स्थान आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय स्थान यावरून खोचक टोला लगावला आहे. तसेच या ट्विटला वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा...., असे कॅप्शनही दिले आहे.
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा....@SaamanaOnline@ShivSena@ShivsenaCommspic.twitter.com/XAU5k2W65C
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 20, 2023
दरम्यान, सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सभा घेत आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईत होईल. समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"