Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 02:07 PM2022-07-23T14:07:10+5:302022-07-23T14:07:45+5:30
रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल
Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातील राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. शिंदे गटावर सातत्याने टीका होत असताना कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते रामदाम कदम यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदान जवळच आहे, असा एका अर्थाने इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. ( Maharashtra Political Crisis )
रामदाम कदम यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेतेमंडळी विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे आहेत असं शिंदे गटातील अनेक लोक बोलत आहेत. तुमच्या मते ते बडवे खरंच कोण आहेत, आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे खरंच शिवसेनेला फटका बसला आहे का? या प्रश्नाचं एबीपीमाझाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मला आज नावं घ्यायला लावू नका. कारण नावं सगळ्यांना माहिती आहेत. नावं तुम्हीच घेतली आहेत पण तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे. पण मी तेवढा कच्चा खिलाडी नाही. योग्य वेळ आली की नक्कीच ती नावं पण घेईन. घोडं मैदान लांब नाही. मी काही गोष्टी आज पहिल्यांदाच लोकांसमोर बोललो आहे. त्यामुळे रामदास कदमला उगाच बोलवलं असा पश्चात्ताप तुम्हाला होणार नाही."
"पक्षाने नवं नेतृत्वाला संधी द्यायला हवी असं माझंही मत आहे. पण मग सुभाष देसाईंना सातत्याने संधी का? मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं होतं? जे लोक ५२ वर्ष काम करत आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि सुभाष देसाईंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मैदानात शांतता होती. कोणालाही जल्लोष करावासा वाटला नाही. तेच एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांचा, बाळासाहेबांच्या नावाचा आणि शिवसेनेचा जयघोष सुरू होता", असाही रोखठोक मुद्दा रामदास कदमांनी मांडला.