"आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेल..."; शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर भाजपाचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 12:20 AM2022-10-09T00:20:11+5:302022-10-09T00:20:52+5:30
"यालाच म्हणतात दोस्तीचे ढोंग अन् पाठीत खंजीर...", असेही राम कदम यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
Shiv Sena Symbol, Ram Kadam vs Sharad Pawar: महाराष्ट्रात जून महिन्यात राजकीय उलटफेर झाला. शिवसेनेतून ५० आमदारांनी बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले. त्यानंतर, आकड्यांच्या बळावर, शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे. पण तत्पूर्वी, अंधेरीची पोटनिवडणूक लागली असल्याने पक्ष चिन्ह आणि नावाचा काय फैसला होतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. निवडणूक आयोगाने तात्पुरते या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले असून, शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे कोणालाच वापरता येणार नाही. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच, भाजपाचे राम कदम यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केली.
"असं ऐकायला मिळतंय की आज बारामतीमध्ये फटाके फोडले जात आहेत. कदाचित दीर्घकाळापासून बघितलेलं 'त्यांचं' स्वप्न आज पूर्ण झालंय. आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेलच. यालाच म्हणतात दोस्तीचे ढोंग अन् पाठीत खंजीर... किंवा घर न सोडणाऱ्या नेत्याच्या ('किंबहुना'च्या) भाषेत गद्दारी", अशा शब्दांत भाजपाचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
सुना है आज #बारामती मे फटाके फूट रहे है ...
— Ram Kadam (@ramkadam) October 8, 2022
शायद अरसो का उनका सपना क्या आज पुरा हुआ.
इसे ही केहते है #दोस्ती का नाटक और पीठ मे खंजीर ..
और घर न छोडनेवाले नेता की भाषा मे... #गद्दारी
--
अन आज ..
— Ram Kadam (@ramkadam) October 8, 2022
जाणता राजा समाधानी झाला असेलच...
यालाच म्हणतात दोस्तीचे ढोंग ...
अन पाठीत खंजीर ..
किंवा किंबहुनाच्या भाषेत गद्दारी
दरम्यान, अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी १० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव कोण वापरणार यावर अनेकविध चर्चांना उधाण आले होते. तशातच, आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले असून अंधेरीच्या निवडणुकीत ठाकरे किंवा शिंदे गटाला हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले आहे, त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, यावर अजूनही ऊहापोह शिल्लक आहे.