Maharashtra Karnataka Border Dispute: “आपले प्रकल्प गुजरातला नेले तसं कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात”: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:26 PM2022-12-14T22:26:40+5:302022-12-14T22:27:25+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: गुजरात निवडणुकीसाठी आमचे प्रकल्प तिकडे नेले. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी कदाचित इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक घेतली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी दोन्ही राज्यांनी आपापल्या भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू झालेला सीमावाद मिटवण्यासाठी आणि घटनात्मक मार्ग शोधण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही राज्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत. बैठकीत काही निर्णय झाले आहेत, त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणतेच राज्य दुसऱ्या राज्यावर दावा सांगणार नाही. याशिवाय, दोन्ही राज्यांकडून तीन-तीन बैठक घेऊन योग्य मार्ग काढतील, असे अमित शाह यांनी सांगितले. तत्पूर्वी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली.
कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात
जो काही वादविवाद आहे तो आपल्याच देशातील दोन राज्यांमध्ये आहे. असे वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत. काही निकाली निघाले आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून जो आक्रमकपण दिसत आहे, तो कदाचित निवडणुकीसाठी असू शकतो. जसे गुजरात निवडणुकीसाठी आमच्या इथले काही प्रकल्प तिकडे नेले. त्याचप्रकारे कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात. दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाहांच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात ज्या घटना सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, मराठी भाषेचा सन्मान व्हावा. तसेच मराठी माणसांवर कुठलाही अन्य होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची म्हणजेच आमची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशा प्रकारची सूचना केंद्रिय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"