Maharashtra Politics: “सरकार पडणारच... मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:20 PM2023-02-06T16:20:48+5:302023-02-06T16:21:22+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. तुमचे सरकार परत आले पाहिजे, असे अनेक जण येऊ सांगतात, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. तर शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. यातच हे घटनाबाह्य सरकार पडणारच आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या एका जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तुम्ही लिहून घ्या. हे सरकार तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तारच होणार नाही. फक्त गाजर देऊन ठेवली आहेत. सगळ्या आमदारांना की तुला मंत्री बनवतो वगैरे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाही. या मंत्रिमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाही. हे सरकार चालणार कसे? हे सरकार नक्की कुणाचे आहे. दिल्लीश्वरांचे आहे की महाराष्ट्राचे हा प्रश्न पडला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली.
हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या
जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वत:साठी रोजगार शोधत आहेत. स्वत:साठी दिल्लीत जातात. स्वत:साठी सूरतेला जातात. स्वत:साठी गुवाहाटीला जातात. झाडे, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काही मागितलेले तुम्ही ऐकलेय का? कधी तुम्ही ऐकलेय का की, लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी मगितले आहे. कारण असे घडलेच नाही. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी जातात, लोकांसाठी जात नाहीत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान,येताना मी एका पेट्रोल पंपावर थांबलो तेव्हा अनेक लोक मला गाडीवर टक टक करून सांगायचे की आदित्यजी तुमचे सरकार परत आले पाहिजे. कारण उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही. अनेक लोकांचे असे असते की माझ्या जिल्ह्यात काम झाले पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि माझा असा कोणता जिल्हाच नसल्यामुळे आणि आख्खा महाराष्ट्रच आमचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगती व्हावी, शाश्वत विकास व्हावा, चांगले उद्योग यावेत यासाठी आम्ही काम करत होतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"