“किरीट सोमय्या अन् सुर्वेंच्या व्हिडिओचे आधी काय ते सांगा, मग राहुल गांधी विषयावर बोला”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 01:32 PM2023-08-10T13:32:07+5:302023-08-10T13:34:50+5:30
राहुल गांधी विषयावार आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
INDIA Vs NDA: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर भाष्य करताना भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. यानंतर राहुल गांधी यांनी महिला सदस्यांकडे पाहून फ्लाइंग किस दिली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, शिवसेना ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.
फ्लाइंग किस मुद्यावरुन राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. मुंबईत भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली.
राहुल गांधी विषयावार आम्हाला शिकवण्याची गरज नाही
किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओवर काय कारवाई केली हे आधी स्पष्ट करावे. या संदर्भात मी स्वत: विधान परिषदेत सभापतींना तो व्हिडिओ दिला आहे. अनेक चॅनलवर तो प्रसिद्ध झाला आहे. यांनी राहुल गांधी विषयावार आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सुर्वे यांचा किस घेतानाचा व्हिडीओ फेसबुकवर आला होता, त्यावर बोला. मग राहुल गांधी प्रकरणावर बोला, असा जोरदार पलटवार अंबादास दानवे म्हणाले.
दरम्यान, भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ चा नारा दिला आहे. भाजप ४५ नाही तर ५४ म्हणतील. भाजपचे डोके फिरले आहे. ४५ त्यांची जहागिरी आहे का? सर्व्हे बाहेर येत आहेत. महाराष्ट्राची जनता भाजपला ४ ते ५ जिंकून देईल, असा दावा दानवे यांनी केला.