Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ; ठाकरे गटाच्या नेत्याचे ‘त्या’ तीन पक्षांकडे बोट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:03 PM2023-03-30T14:03:32+5:302023-03-30T14:05:05+5:30
Maharashtra News: छत्रपती संभाजीनगरधील घटनेवरून ठाकरे गटातील नेत्याने मोठा आरोप केला आहे.
Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराच्या परिसरात मध्यरात्री काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण परिसरात आपण शांतता ठेवली पाहिजे. पण हे का घडले? हा प्रकार घडवणारे लोक कोण आहेत? याकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या महिनाभरापासून आम्ही सातत्याने म्हणत आहोत की, या शहरातील वातावरण खराब करून लोकांच्या मनात विष कालवले जात आहे. एमआयएमसारखी संघटना १० ते १५ दिवस आंदोलन करते. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत आंदोलने सुरू असतात. पोलीस काहीच दखल घेत नाहीत. कोणावरही कारवाई करत नाहीत. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत. संरक्षण करणाऱ्यांवर हात उचलले जातात, ते हात पोलिसांनी तोडून टाकले पाहिजेत. या गोंधळामागे एआयएमआयएम आणि राज्य सरकारमधले दोन पक्ष आहेत, असा मोठा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे
मी महिनाभरापासून सांगतोय की, संभाजीनगरात अशांतता पसरवली जात आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर आरोप केले.
दरम्यान, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"