पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:14 PM2024-06-24T18:14:57+5:302024-06-24T18:15:33+5:30
Shiv Sena Thackeray Group News: नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला.
Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून आता दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष म्हणून उभे राहून जिंकलेल्या खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते, त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते. अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विश्वजित कदम यांनी म्हटले. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते
अजूनपर्यंत विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही. खरे तर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, असे कुणालाही वाटले नव्हते, पण ते मुख्यमंत्री झाले. आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या, येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती. तो शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही. केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे दानवे म्हणाले.