Maharashtra Politics: “बच्चू कडूंचे उद्धवजींशी थेट बोलणे होते, ते ठाकरे गटासोबत जातील”; माजी खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:21 PM2022-12-04T17:21:45+5:302022-12-04T17:22:36+5:30
Maharashtra News: शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद यांसह अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही गटाकडून अनेक दावे केले जात आहेत. शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू नाराज असल्याचे सांगितले जात आहे. अशातच एका माजी आमदाराने बच्चू कडूउद्धव ठाकरेंसोबत जातील, असा दावा केला आहे.
बच्चू कडू माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगासाठी मंत्रालय झाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने त्यांचे खूप अभिनंदन करतो. शेतकऱ्यांसाठी, अपंग बांधवांसाठी लढणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. सर्वसामान्यांना मदत करणारे ते नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे त्यांच्यावर आणि त्यांचेही उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. ते ठाकरेंनाच साथ देतील, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जनतेची खूप कामे असून कामामध्ये खूप व्यस्त असतो
चंद्रकांत खैरे रिकामटेकडे आहेत, त्यांना काही काम उरले नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली होती. याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, बच्चू भाऊ आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात ५ आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. जनतेची खूप कामे आहेत. संघटनेची खूप कामे आहेत. मी कामामध्ये खूप व्यस्त असतो, असे खैरेंनी सांगितले. तसेच बच्चू कडू उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर मला अधिक चांगले वाटेल. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचे थेट उद्धव ठाकरेंशी बोलणं होतात. ते त्यांच्याकडे जातील आणि बोलतीलही, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. आधीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. पुढील विस्तारावेळी तरी आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा त्यांना असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"