“JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:50 AM2023-11-24T08:50:13+5:302023-11-24T08:51:10+5:30

Shiv Sena Thackeray Group Vs Central Govt: गाझापट्टीप्रमाणे जम्मू काश्मीरमधील जनता जणू बंदिस्त आहे. कश्मीर समस्येवर तोडगा नाही आणि मणिपूरही अद्यापी पेटलेलेच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

shiv sena thackeray group criticised bjp and central govt over jammu kashmir terror attacks | “JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका

“JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका

Shiv Sena Thackeray Group Vs Central Govt: देश धोक्यात आहे. राष्ट्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे हे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस, लष्करी अधिकारी, जवानांचे बळी गेले. त्याचा आकडा धक्कादायक आहे, पण सरकारला त्याची ना खंत ना खेद. काँगेसमुक्त भारत, शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा आहे, पण दहशतवादमुक्त कश्मीर आणि मणिपूर करायचे नाही. पाकव्याप्त कश्मीर घेण्याची भाषा ते करतात, पण आहे त्या कश्मीरमध्ये जवानांचे हौतात्म्य थांबवता येत नाही. राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन व दोन जवान पुन्हा बलिदानाच्या वेदीवर चढले. कश्मीरमध्ये पुनः पुन्हा जवानांचे रक्त सांडत आहे, पण दिल्लीला चढलेली सत्तेची व निवडणुकांची नशा उतरत नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे मोदी-शाहांसाठी युद्धभूमीच झाली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ पाच राज्यांच्या युद्धभूमीवर उतरले आहे. पाच राज्यांत राजकीय युद्ध सुरू आहे व त्यात भाजपने काँगेससह त्यांच्या राजकीय दुश्मनांना गाडण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी सरकारने काँग्रेस तसेच गांधी कुटुंबाच्या मालकीच्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या मालमत्तेवर टाच आणली. ही मालमत्ता साधारण सहाशे कोटी रुपयांची आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली व स्वातंत्र्य लढय़ाचे हत्यार म्हणून ‘हेराल्ड’ने काम केले, पण स्वातंत्र्य लढ्याशी कोणताही संबंध नसलेल्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’वर जप्ती आणली व विजयी विकृत हास्य केले. मात्र त्याच वेळी कश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करणाऱ्यांचे, त्यांना पैसा देणाऱयांचे पंबरडे मोडण्यात मोदी-शाहांचे सरकार अपयशी ठरले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला.

मोदी-शाहांना कश्मीर प्रश्नाचे फक्त राजकारण करायचे

मोदी-शाहांना कश्मीर प्रश्नाचे फक्त राजकारण करायचे आहे. ३७० कलम हटविण्याचा खेळ असेल नाहीतर ‘पुलवामा’हत्याकांड, या घटनांचा वापर फक्त मते मागण्यासाठी झाला. साडेचार वर्षे झाली तरी जम्मू-कश्मीरात विधानसभा निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. निवडणुका घ्यायला केंद्र सरकार घाबरते आहे. जम्मू-कश्मीरातील इंटरनेट सेवा आजही बंद आहे व गाझापट्टीप्रमाणे तेथील जनता जणू बंदिस्त आहे. लोकशाही व स्वातंत्र्याची तेथे गळचेपी सुरू आहे. त्यात विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांचा आक्रोश भाजपचे मन अस्वस्थ करीत नाही. कश्मिरी पंडितांच्या घर वापसीचे वचन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत देणारे मोदी-शाह त्यानंतर तेथे फिरकलेच नाहीत. कश्मीर समस्येवर तोडगा नाही आणि मणिपूरही अद्यापि पेटलेलेच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

दरम्यान, मोदी-शाहा मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडची राजकीय लढाई जिंकायला उतरले आहेत. मोदी-शहा मणिपूर समस्येवर बोलायला तयार नाहीत, कश्मीर समस्येवर बोलत नाहीत. ते फक्त काँग्रेस व गांधी परिवारावर बोलतात. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय वैऱ्यांचा काटा काढता येईल, पण मणिपूर, कश्मीरमधील दहशतवाद व लष्करी जवानांचे हौतात्म्य थांबवता येणार नाही. कश्मीरात जवानांच्या हत्या थांबत नाहीत. कारण ही लढाई हत्यारांची आहे, या शब्दांत ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले.
 

Web Title: shiv sena thackeray group criticised bjp and central govt over jammu kashmir terror attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.