Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंमध्ये हिम्मत असेल तर शिवसेना भवनाजवळ पाय ठेवून दाखवावा”; ठाकरे गट आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 04:34 PM2023-02-20T16:34:01+5:302023-02-20T16:35:00+5:30
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करत, आई जगदंबा पुन्हा रिक्षा चालवायला लावेल, या शब्दांत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सडकून टीका केली.
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी शेकडो शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ जमले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.
बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आणि वाढवलेला पक्ष हवा. पक्षाचा धनुष्यबाण हवा. मग बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबीयांना त्रास का देता, अशी विचारणा करत ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत घणाघाती टीका केली. मरेपर्यंत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पाठिशी ठाकरे गटाच्या या रणरागिणी उभ्या आहेत, कायम उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार आहोत, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना कधीही शांतता लाभणार नाही
एकनाथ शिंदे यांनी एकटे शिवसेना भवनाजवळ यावे. या ठिकाणी पाय ठेवून दाखवावा, बाकीची मंडळी सोबत आणू नयेत. आई जगदंबा एकनाथ शिंदेंना पुन्हा रिक्षा चालवायला लावेल. कधीही शांतता लाभणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदेंनी कितीही खटले दाखल केले तरी आम्ही शिवसैनिक घाबरणारे नाही. उद्धव ठाकरेंना त्रास देऊन चांगले केले नाही. आजारी असतानाही उद्धव ठाकरे खूप काम करतात. एकनाथ शिंदेंचे कधीही चांगले होणार नाही. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला संपवायला निघालात, तुम्ही कधीही सुखी होणार नाही, या शब्दांत हल्लाबोल करण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी कोण होते, त्यांची औकात काय होती. चहा विकत होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आणले. बाळासाहेबांनी त्यांना मोठे केले. त्यांच्याच मागे एकनाथ शिंदे गेले. तुम्ही मुंबई खरेदी करायला येणार का, असा सवाल करत, पण आम्ही तुम्हाला देऊ का, अद्यापही निवडणुका का लावल्या नाहीत. या लोकांनीच गेम केला. इतकी वर्ष मोदी आणि शाह येत नव्हते, आताच कसे यायला लागले, मुंबई घेण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई तुमची नाही. या निवडणुकीत शिवसैनिक त्यांची सगळी ताकद दाखवतील, अशी टीका रणरागिणींनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"