“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:32 AM2023-07-07T08:32:12+5:302023-07-07T08:36:27+5:30
जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे.
Maharashtra Political Crisis: भाजीपाल्यापासून कडधान्यांपर्यंत दराचे शतक गाठले आहे. कोथिंबीर, आले, मिरची, वाटाणे यांनी त्रिशतकी मजल मारली आहे. लसूणही त्यात मागे नाही. टोमॅटोने प्रतिकिलो १५० रुपयांचा पल्ला गाठला आहे. भाजीपाल्याच्या दराने ‘त्रिशतक’ गाठले आहे, टोमॅटो भडकला आहे, जनता ‘लालबुंद’ झाली आहे. तिकडे मणिपूर पेटलेलेच आहे. मोदी सरकार नेहमीप्रमाणे शांत आणि ढिम्म आहे. नऊ वर्षांच्या सत्ताकाळाचे ढोल पिटत आहे, फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे. महागाईच्या वणव्याची आणि त्यात होरपळणाऱ्या जनतेची या सरकारला जाणीव आहे काय, अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकारमध्ये सत्तेवर आले. मागील नऊ वर्षे सलग त्यांचीच केंद्रात सत्ता आहे, पण महागाई आणि दरवाढीबाबत स्थिती काय आहे? दरवाढ आणि महागाई बिळात लपून बसली आहे काय? वास्तव हेच आहे की, मोदी राजवटीतही ना दरवाढ थांबली आहे, ना महागाई लपून बसली आहे. दैनंदिन जीवनातील भाजीपाला, फळफळावळ यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोमॅटोने तर कहरच केला आहे. पावसाला झालेला उशीर, त्याआधी बसलेले अवकाळी आणि गारपिटीचे तडाखे, त्यात झालेले शेतमालाचे नुकसान टोमॅटोच्या भाववाढीसाठी जबाबदार असल्याचे आता सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही, परंतु सगळेच जर निसर्गाच्या ‘भरोसे’ सोडायचे असेल तर सरकार म्हणून सत्तेत बसलेल्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यांचे काय? अशी विचारणा शिवसेनाउद्धव ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.
जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत?
पेट्रोलच्या दरवाढीबद्दल हे कच्च्या तेलाच्या जागतिक दरवाढीकडे बोट दाखवितात. मग, जेव्हा हे जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत? या प्रश्नावर नेहमी हात वर करतात. मोदी राजवटीत तरी दुसरे काय घडत आहे? नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णयांचे ढोल तुम्ही सर्वत्र पिटत आहात. मग या नऊ वर्षांनंतरही ‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही? असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.