घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब तुम्ही हवे होता; ठाकरे गटाने जागवल्या स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:16 AM2023-11-17T09:16:15+5:302023-11-17T09:19:51+5:30

Shiv Sena Balasaheb Thackeray: हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा बाळासाहेब ठाकरेंचा इशारा खरा ठरताना दिसत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

shiv sena thackeray group criticised shinde group and bjp on balasaheb thackeray remembrance day | घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब तुम्ही हवे होता; ठाकरे गटाने जागवल्या स्मृती

घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब तुम्ही हवे होता; ठाकरे गटाने जागवल्या स्मृती

Shiv Sena Balasaheb Thackeray: देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल, पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. आज आपलेच लोक संविधान व देशाचे कायदे मानायला तयार नाहीत. या घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब, तुम्ही आज हवे होता! बाळासाहेब, तुम्ही आज नाहीत, पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना व महाराष्ट्राची कवचकुंडले बनून लढते आहे, ती लढत राहील, असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या. 

महाराष्ट्राचे राजकारण हे ‘भयंकर’ या शब्दाला साजेसे झाले आहे. देशात लोकशाही, संसद, न्यायालये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळला जात आहे. महाराष्ट्रात ‘जात विरुद्ध जात’ असा आरक्षणाचा भडका उडाला आहे. त्या भडक्यात मराठी माणसांचे ऐक्य होरपळताना दिसत आहे. मुंबईचे लचके तोडले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीचे महत्त्व कमी केले जात आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात लॉबी पळवत आहे. मुंबई ‘अदानी’स विकली जात असताना त्या सौद्यात भाजपसह सगळे सामील होत आहेत. मात्र, या सगळ्यात बाळासाहेब आपल्यात नाहीत. बाळासाहेब नाहीत ही वेदना आहे, पण त्यांनी दिलेला लढण्याचा विचार म्हणजेच धगधगती प्रेरणा आहे. शरीराने महाराष्ट्राच्या मातीत विसावलेल्या बाळासाहेबांनाच पळविण्याचा प्रयत्न झाला तरीही गद्दारांच्या छातीवर पाय रोवून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उभेच आहेत, असे ठाकरे गटाने सामना अग्रलेखात म्हटले आहे.

धुरंधर पुरुषांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गणना केली जाते

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन स्वतःच्या तेजस्वी बुद्धीने व अलौकिक कर्तृत्वाने एका कालखंडावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, नेतृत्वाचा, कुंचल्याच्या फटकाऱ्यांचा ठसा उमटविला अशा इतिहास घडविणाऱया धुरंधर पुरुषांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गणना केली जाते. महाराष्ट्रात आज जे बेइमानांचे राज्य सत्तेवर आहे, त्या बेइमान राज्यकर्त्यांच्या ‘खुर्च्या’ त्यांनी रोज भिजवल्या असत्या. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले महाराष्ट्रद्रोही राजकारण त्यांनी एका फटकाऱ्यात गदागदा हलवून सोडले असते. इलेक्शन कमिशनने चाळीस आमदार बेइमान झाले या भांडवलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उदक शिंदे-मिंधेंच्या हातावर सोडले. अर्थात, आज ही बेइमान मंडळी आणि त्यांना ताकद देणारी दिल्लीतील तथाकथित ‘महाशक्ती’ त्या आनंदात असली तरी उद्या निवडणुका झाल्यानंतर बाळासाहेबांची खरी शिवसेना कशी घट्ट पाय रोवून उभी आहे, हे या बेइमानांच्या लक्षात येईल, असे ठाकरे गटाने नमूद केले आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांनी व्यक्तिगत व राजकीय फायद्यासाठी तडजोडी केल्या नाहीत. बाळासाहेब राजकारणात दीपस्तंभाप्रमाणे उभे राहिले, पण दलदलीत उतरले नाहीत. निराशेतून आत्मविश्वासाचा जागर निर्माण करण्याचे सामर्थ्य एकमेव बाळासाहेब ठाकरे यांच्यात होते. कारण कोणत्याही कठीण काळात ते निराश झाले नाहीत व हार मानणारे ते नव्हते. देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. शेठ, सावकार, गांडाभाईंची चलती आहे व त्यात सामान्य माणूस गुदमरला आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. 


 

Web Title: shiv sena thackeray group criticised shinde group and bjp on balasaheb thackeray remembrance day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.