“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 07:30 AM2023-06-20T07:30:02+5:302023-06-20T07:34:21+5:30

हे चित्र भयंकर आहे. आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

shiv sena thackeray group criticised states shinde fadnavis and central pm modi govt | “महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

googlenewsNext

Shiv Sena Thackeray Group News: मान्सून रखडला आणि सूर्य कोपला अशा विचित्र कोंडीत सध्या देश सापडला आहे. पुन्हा ज्यांनी यातून जनतेची सुटका करायची ते राज्यकर्ते वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग करीत आहेत. उत्तर प्रदेशात लोक उष्माघाताने प्राण सोडत आहेत. देशात एकीकडे महागाई, बेरोजगारी, विद्वेषाचा वणवा पेटला आहे. दुसरीकडे सूर्य कोपला आहे. जनता त्यात होरपळून निघत आहे आणि राज्यकर्ते थंड आहेत. हे चित्र भयंकर आहे!, या शब्दांत ठाकरे गटाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

पावसाने तर ओढ दिलीच आहे, पण उष्माघाताची भयंकर लाट उत्तरेकडील राज्यांसाठी गंभीर बनली आहे. तीव्र उष्णतेच्या ज्वाळा आणि झळा या राज्यांना सोसाव्या लागत आहेत. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या झळांनी गंभीर रूप धारण केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उष्माघाताची ही स्थिती निश्चितच गंभीर आहे. कारण रुग्णांची संख्या या दोन्ही राज्यांत वाढत आहे. पुन्हा जखमी आणि मृत्यूचा हा आकडा रुग्णालयांमधील आहे. त्यामुळे दाखल न झालेल्या, परंतु मरण पावलेल्या रुग्णांचा विचार केला तर मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात आणखी जास्त असू शकतो, असा दावा ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते

देशातील उष्म्याची स्थिती कायमच आहे. त्यात आधी ‘एल निनो’चा इशारा आणि नंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे. मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजे यंदा जवळजवळ पूर्ण जून महिना ‘पावसाचा अभाव आणि उष्णतेचा प्रभाव’ असा जाणार आहे. त्याचा दुष्परिणाम पीकपेरणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ावर तर होणार आहेच, परंतु मान्सूनचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे देशाचा खरीप हंगामदेखील विस्कळीत होऊ शकतो. धान्य उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, अशी शक्यता ठाकरे गटाकडून वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने बिहारसाठी ‘अत्यंत उष्ण हवामान’ असा अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत तेथील परिस्थिती आणखी गंभीर होणार हे निश्चित आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तीव्र उष्म्याचा तडाखा जूनमध्येही जाणवत आहे. किंबहुना मुंबईच्या विक्रमी तापमानाची नोंद जूनमध्ये झाली. रखडलेला मान्सून आणि वाढलेला उष्मा यासाठी ज्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाकडे बोट दाखविले गेले ते आता पाकिस्तानात सरकले आहे. मात्र तरीही त्याचे ‘आफ्टर इफेक्ट्स’ देशाला जाणवत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आणि इतर थंड हवेच्या ठिकाणी यंदा सूर्य आग ओकताना दिसला, असे म्हटले आहे. 

 

Web Title: shiv sena thackeray group criticised states shinde fadnavis and central pm modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.