“मिशन सन, शुक्र स्वप्नांचा भुलभुलैया, भरकटलेले कांदा ‘यान’ आधी लॅण्ड करा!”; ठाकरे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 08:17 AM2023-08-25T08:17:18+5:302023-08-25T08:19:07+5:30
Maharashtra Politics: सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर २०२४ मध्ये सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हाला कळणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करीत आला दिवस ढकलीत आहे. राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत. ‘मिशन मून’नंतर ‘मिशन सन’, ‘मिशन शुक्र’ अशा नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत. ‘मिशन सन’ वगैरे ठीक आहे, पण सध्या भरकटलेले कांद्याचे ‘यान’देखील नीट ‘लॅण्ड’ होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
शेतकरी कांदा फेकून देण्याची वेळ आल्याने सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्राचा कांदा उत्पादक शेतकरी अघोषित निर्यात बंदीविरोधात आंदोलन करीत रस्त्यावर उतरला आहे. देशातील सगळ्यात हतबल कोण असेल तर तो सामान्य शेतकरी आहे. ‘निसर्ग जगू देत नाही आणि सरकार मरू देत नाही’ अशा विचित्र चरकात शेतकरी सापडला आहे. त्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी दारुण आहे की, त्याचा एकही हंगाम आंदोलन केल्याशिवाय जात नाही. कधी दरासाठी तर कधी सरकारी निर्णयाविरोधात, कधी आयातबंदीसाठी तर कधी निर्यातबंदीसाठी त्याला रस्त्यावर उतरावे लागते. दर पडल्याने कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. आताही मोदी सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादकांचा वांधाच करून ठेवला आहे, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखात सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सत्ताधारी आता शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले आहेत?
कांद्याचे दर वाढतील आणि सामान्य माणसाची होरपळ आणखी वाढेल हे. शेतकरी आणि सामान्य जनता यांपैकी कोणालाही झळ पोहोचणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागते हे खरेच, परंतु प्रत्येक वेळी या धोरणाचा फटका बळीराजालाच सहन करावा लागतो त्याचे काय? कांद्याचे निर्यात शुल्क वाढविण्यामुळे हेच झाले आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा लाव्हा उसळून वर आला आहे. काही ठिकाणी संतप्त कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले, तर काही ठिकाणचे कांद्याचे लिलाव बंद पाडले गेले. सरकारच्या आश्वासनानंतर तीन दिवसांनी नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. मात्र दर पडल्याने शेतकऱयांनाच ते बंद पाडण्याची वेळ आली. उठता बसता ‘शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे म्हणणारे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आता शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले आहेत? या प्रश्नावर थेट जपानवरून ‘ट्वि ट्वि’ करणारेदेखील सोयिस्कर मौन का बाळगून आहेत, अशी विचारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढय़ाने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल. पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे, असे सांगताना पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील १४० कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेकांचे लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर, सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.