“शिंदेंना कधी बाळासाहेबांची भूमिका समजली नाही”; भाजपच्या प्रचारावरुन ठाकरे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 07:58 AM2023-11-13T07:58:09+5:302023-11-13T08:01:04+5:30
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतात भाजपचा प्रचार करणार. त्यापेक्षा थेट भाजपात सामील का होत नाहीत?
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र भाजपश्रेष्ठींना देण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील भाजपचा प्रचार करायला जाणार आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
शिंदे हे सुसंगत विचाराबाबत कधीच प्रख्यात नव्हते. मूळात व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजली नाही. म्हणूनच ते पाच राज्यांत भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्कीच होते. वाजपेयी-आडवाणी यांनी दिल्लीची सत्ता सांभाळली. यासाठी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रातून भक्कम पाठिंबा मिळवून दिला, पण इतर राज्यांत जाऊन त्यांनी भाजपच्या पखाली वाहिल्या नाहीत, या शब्दांत सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे.
प्रचाराचे मुद्दे तरी काय असणार?
सगळाच नकली माल असल्याने नकली शिवसेनेची टोळी चार राज्यांत भाजपच्या प्रचारास चालली आहे. बरं, त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तरी काय असणार? मोदी-शहांची भलामण करणे व शिवसेना (नकली) तुमची बटीक आहे हे दाखवून देणे हाच त्यांचा प्रचाराचा धागा असेल. महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतात भाजपचा प्रचार करणार. त्यापेक्षा हे थेट भाजपात सामील का होत नाहीत? असा प्रश्न लोकांना पडला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची टोळी सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे? ते पाहायला हवे. त्यांच्या टोळीतील दोन प्रमुख लोक गजानन कीर्तिकर व रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप-प्रत्यारोप केले. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेशी पहिली गद्दारी व आता जेथे आहेत तेथे दुसरी गद्दारी. कीर्तिकर-कदम यांचे भांडण इतक्या टोकाला पोहोचले आहे की, बहुधा त्याच त्राग्याने मनःशांतीसाठी मुख्यमंत्री शिंदे चार राज्यांत प्रचारास निघाले आहेत. कीर्तिकर व कदम यांनी एकमेकांच्या गद्दारीचे ‘पुरावे’च जाहीर केले. त्यामुळे शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत, असा मोठा दावा ठाकरे गटाने केला आहे.