Maharashtra Politics: “धनुष्यबाण व पक्षाबाबत निर्णय होईपर्यंत...”; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:55 AM2023-01-12T08:55:20+5:302023-01-12T08:56:36+5:30
Maharashtra News: धनुष्यबाण चिन्ह अजगरासारखे गिळंकृत करण्यासाठी शिंदे गटाकटून कांगावा केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवर तारीख पे तारीख पडत असताना दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाबाबत मोठे दावे शिंदे गटाकडून करण्यात आले. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक मोठी मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेत दर पाच वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेण्यात येतात. त्यानुसार निवडणुका होऊन गठीत झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या कार्यकाळास येत्या २३ जानेवारी रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुन्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षप्रमुख पदाच्या निवडीसह संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख पदासह संघटनात्मक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला जर परवानगी देता येत नसेल व आयोगाच्या काही अटी-शर्ती असतील तर धनुष्यबाण व पक्षाबाबतचा निर्णय येईपर्यंत आहे तशीच स्थिती ठेवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंतीही शिवसेनेने केली आहे.
संघटनात्मक निवडणुकीची प्रकिया पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. शिवसेनेशी गद्दारी करून पक्षातून बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारिणीची बैठक घेऊन दर पाच वर्षांनी होणारी संघटनात्मक निवडणुकीची प्रकिया पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. लोकशाही मूल्याप्रमाणे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच संघटनात्मक निवडणुका झालेल्या आहेत. दर पाच वर्षांनी शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होत असतात. मात्र, सद्यस्थितीत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा विषय निवडणूक आयोगापुढे आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखपदासह संघटनात्मक निवडणुकीसाठी आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गट नुसता आकड्यांची हवाबाजी करत आहे. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पडताळणी करावी आणि दोन्ही गटांची परेड घ्यावी. निवडणूक आयोगाने आमच्याकडे कार्यकर्ते किती, अशी विचारणा केली होती. आम्ही २३ लाखांच्या वर दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सोपविले आहेत. तीन लाख पदाधिकारी व वीस लाख प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठविले आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह अजगरासारखे गिळंकृत करण्यासाठी शिंदे गटाकटून कांगावा केला जात आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"