“देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू, मोदी भेटीत भाजप स्वतःची महाआरती करुन घेईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:02 AM2023-08-01T08:02:01+5:302023-08-01T08:03:12+5:30
Thackeray Group Vs PM Modi: मोदींना विरोध, पवारांच्या हस्ते पुरस्कार, टिळक कुटुंब भाजपमय; देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! ठाकरे गटाचे साकडे
Thackeray Group Vs PM Modi: देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात ९३ वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा!, असे साकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घातले आहे.
टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात येत आहेत. पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसब्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे मोदी भेटीत भाजप स्वतःचीही महाआरती करून घेईल. याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे, असे ठाकरे गटाने सामना अग्रलेखात म्हटले आहे.
मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते
मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते; पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. त्यामुळे टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली. तसेच अर्थात विचारभिन्नता असली तरी कर्तबगारी, राष्ट्रसेवा त्यांच्या अंगी असेल तर तो देण्यास हरकत नाही; पण मोदी यांना पुरस्कार देण्यात एकप्रकारची अपरिहार्यता दिसते, असा टोलाही लगावण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत व शरद पवार हे तर मोदींचा सन्मान करतील. ते या सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात थोडी जरी चीड असती तर, अशा भ्रष्ट वगैरे लोकांच्या हातून मी टिळकांच्या नावे पुरस्कार स्वीकारणार नाही व यापैकी एकही व्यक्ती मंचावर किंवा मंडपात असता कामा नये, असे त्यांनी आयोजकांना बजावून सांगायला हवे होते, अशी अपेक्षा ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.
देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय
देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय व त्या लढ्यासाठी ‘इंडिया’ ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत. मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, असे सांगत ठाकरे गटाने शरद पवार यांच्या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, दुसरे आश्चर्य हे शरद पवारांचे. महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. शरद पवार हे ‘मऱ्हाटे’ आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात. तेव्हा त्यांच्याकडून वेगळय़ाच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.