Maharashtra Politics: “राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको हवं होतं”; भास्कर जाधवांनी सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:18 PM2023-03-17T13:18:26+5:302023-03-17T13:19:29+5:30
Maharashtra News: या पक्षातून त्या पक्षात जाणे हे कदापीही चांगले नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला संप, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि सत्ताधारी तसेच विरोधकांच्या विविध मुद्द्यांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा शिवसेनेत परतलेले भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना भास्कर जाधव यांनी राजकीय प्रवासाबाबत बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता. भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोर आमदारांनी अनेक कारण सांगितली, आता ते उघडले पडत आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी हरकत घेतली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त निधी घेतली, अशी तीन कारण सांगण्यात आली. तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे होते, हिंदुत्व पुढे घेऊन जाऊ असे वाटत होते, तर मंत्रिमंडळात शपथ का घेतली, असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी केला.
एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी सबळ कारण नाही
माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असे वाटले नव्हते. आज ज्या पद्धतीने शिवसेनेसाठी लढत आहे, पक्षाची बाजू घेऊन उभा आहे. त्यामुळे खरा शिवसैनिक असून, पक्ष सोडेन असे वाटले नव्हते. पण, नियतीच्या निर्णयापुढे आपण फिके पडतो. म्हणून मला शिवसेना सोडावी लागली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणे हे कदापीही चांगले नाही, असे नमूद करत, पक्ष सोडण्यासाठी कोणाला दोष दिला नाही अथवा टीका-टिप्पणी केली नाही. शिवसेना सोडली, तेव्हा एका शब्दानेही टिप्पणी केली नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी सबळ कारण नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"