“ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:11 AM2024-04-05T09:11:47+5:302024-04-05T09:13:28+5:30
Sushma Andhare News: भाजपावाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
Sushma Andhare News: लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही अवधी राहिला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदासानासाठीच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागांवरून अद्यापही चर्चा सुरू असून, हा तिढा कधी सुटेल, याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मूळ शिवसेनेशी गद्दारी केलेल्या विद्यमान खासदारांना चांगलाच धडा मिळाला. उमेदवारी नाकारण्यात आली. ही त्यांच्याच कर्माची फळे आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
एकीकडे प्रचाराला सुरुवात झाली असून दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, रोहित पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर आक्रमक पद्धतीने हल्लाबोल केला.
निवडणुकीत मतदार गद्दारी करणाऱ्यांची धूळधाण करणार
शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठबळामुळे मोठे होऊन त्यांनी गद्दारी केली. त्यापैकी पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच उमेदवारीच न मिळाल्याने धडा मिळाला आहे. उर्वरित गद्दारांना जनता धडा शिकवेल. गद्दारांना आतापासूनच केलेल्या कामाची फळे मिळत आहे. यवतमाळ, नाशिक आदी ठिकाणचे पाच विद्यमान खासदार अगोदरच बाद झाले. मूळ, निष्ठावानांच्या शिवसेनेचाच विजय होणार आहे. कारण, ‘बाप तर बाप होता है, ओरिजनल तो ओरिजनल होता है,’ हे तेवढेच खरे. भाजपवाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा, कुर्निसात करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले. हे एवढ्यावरच थांबणार नसून, निवडणुकीत मतदार गद्दारी करणाऱ्यांची धूळधाण करणार, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, हे फक्त जाणूनबुजून दाखवले जात. छोटे मोठे वाद होते ते मिटतील. आतापर्यंत इतक्या केसेस टाकल्या तरी शिवसैनिक मागे हटला नाही. गद्दारीला थारा नाही. शिवसेनेत निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते.