“आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:36 PM2023-11-21T13:36:42+5:302023-11-21T13:38:36+5:30
Sushma Andhare News: आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही खोटी आश्वासने दिली जात आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
Sushma Andhare News: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला जात असून, यासाठी छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या ठाम भूमिकेसह मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. दुसरीकडे, आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही जोर लावला आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला आरक्षण देण्याची इच्छाच नाही. मराठा, ओबीसीसह अन्य समाजाची दिशाभूल केली जात आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देतात. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो. भाजपला याची कल्पना आहे. तरीही या प्रश्नाचा जाणीवपूर्वक खेळखंडोबा केला जात आहे. मूळात मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही. त्यामुळे आरक्षण देताना त्रुटी ठेवल्या, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. त्या मीडियाशी बोलत होत्या.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत भाजपा खेळत आहे
कुणालाही आरक्षण द्यायचे असल्यास संविधानातील मर्यादेची अट शिथिल करावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारला हे आरक्षण देता येते का? हा विचार आधी केला पाहिजे. केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. तरीही भाजप ठोस पाऊले उचलत नाही. सरकारचे वेळकाढू धोरण असून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत भाजप खेळत आहे, अशी टीका सुषमा अंधारेय यांनी केली.
दरम्यान, आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक राज्यातील सत्तेत सहभागी आहेत. काही जण मराठा आरक्षणाला समर्थन असल्याचा दिखाऊपणा करत असले तरी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना छुपा पाठिंबा आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नैतिकता गमावली असून, त्यांनी राजकारण आणि समाजकारणाबद्दल बोलू नये, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.