Maharashtra Politics: “किरीटभाऊ, मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही बोलले पाहिजे”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:28 PM2023-01-02T12:28:47+5:302023-01-02T12:29:43+5:30
Maharashtra News: रश्मी उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.
उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे, मी या नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब चुकता करणार आहे. ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, किशोरी पडेणेकर मुंबई महापालिकेचा हिशोब पूर्ण करणार असल्याचा सूचक इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात ठाकरे आणि वायकर यांचा कोर्लई अलिबागचा १९ बंगला घोटाळ्याविरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या आरंभशूर फार आहेत
किरीट सोमय्या काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न १९ बंगल्याचा, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे. सह्यांद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या घटनेतील पीडितासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली, ते ठीक आहे. मात्र, राज्यात ज्या आगीच्या घटना घडत आहे, त्यासाठी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाबाबत हे सरकार गंभीर दिसत नाही. तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री नसणे, ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"