सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:44 AM2023-11-15T11:44:08+5:302023-11-15T11:46:39+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून केल्या जाणाऱ्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
Shiv Sena Shinde Group News: देशभरात दिवाळीची धूम पाहायला मिळाली. दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठाण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. याला आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दिवाळी पहाटच्या निमित्ताने मंगल स्वर कानावर पडावे, अशी परंपरा आहे. दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात. ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी होती. अशी दंगलगाणी पहाटे वाजवणे हे तुमच्या संस्कृतीत बसते का? ही संस्कृती शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवली का? ही संस्कृती महाराष्ट्रालाही मान्य आहे का, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला होता. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे आपल्या एकपात्री नाटकातून हिंदू देवदेवतांना शिव्या घालतात
सुषमा अंधारे हिंदुद्वेषी आहेत. एकपात्री नाटकातून त्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालत असतात. अशी महिला आपल्या सणांबद्दल बोलते. बाळासाहेबांना काय वाटले असते असे त्या विचारतात. पण जी बाई बाळासाहेबांचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करत होती, तिला उद्धव ठाकरे आपल्या बाजूला बसवून घेतात ही शोकांतिका आहे, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. तसेच मुब्रा येथून आम्ही काहींना पळवून लावले. पण, मिनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमातील अलोट गर्दी पाहून आव्हाडांच्या पोटात दुखले असेल. गौतमी पाटीलचे कार्यक्रम पाहिलेत. तिने प्रत्येक कार्यक्रमात अंगभर कपडे घातले होते. दिवाळी पहाटच्या दिवशी पहाटे ५.३० वाजल्यापासून सगळे उभे होते. ६५ वर्षीय आजीही तिथे उपस्थित होत्या. गौतमीच्या क्रेझमुळे आव्हाडांच्या पोटात दुखले असेल, अशी टीका मिनाक्षी शिंदे यांनी केली.
दरम्यान, सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांना ओव्हर स्मार्ट संबोधले. दिवाळी पहाटची व्याख्या काय आहे, हे मला कळले नाही. गणपती, जन्माष्टमीला प्रत्येक कलाकाराला व्यासपीठावर बोलावून नाचवले जाते. तेव्हा कोणीही आक्षेप घेत नाही. गौतमीने अंगभर कपडे घालून व्यासपीठावर नृत्य केले, तिच्याबाबत आक्षेप नोंदवला. पण सनी लिओनी, राखी सावंत, उर्फी जावेद किंवा भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान नावापुरते कपडे घालतात अशा लोकांचा महाराष्ट्रात सन्मान होतो आणि अंगभर कपडे घातलेल्या गौतमीला विरोध होतो. जे नेते या गोष्टीवर बरळतात त्यांची कीव येते. लोकसंस्कृतीचा जागर करणाऱ्या महिलेवर टीका होत आहे. ती गरीब घरातून आली आहे आणि इतर जरा श्रीमंत घरातील आहेत त्यामुळे हा भेदभाव सुरू आहे, असा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.