Maharashtra Politics: “महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु, मोठ्या घोषणा करतायत म्हणजे विधानसभा निवडणूक लागेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:28 AM2022-11-04T09:28:10+5:302022-11-04T09:29:21+5:30
Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले.राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर अन्य काही प्रकल्पही राज्याबाहेर गेले. यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातील बहुतांश प्रकल्प गुजरात गेले आहेत. यातच गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठीही केंद्राकडून काही प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, याचाच अर्थ कदाचित महाराष्ट्रातही आता विधानसभा निवडणूक लागेल, असे मोठे भाकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यात विधानसभा निवडणूक लागू शकते, असा दावा केला आहे.
कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल
महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल. गुजरातचे प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत आहेत, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्यात यंदा ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ‘महासंकल्प’ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. येत्या आठवडाभरात १८ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. तसेच महिनाभरात ग्रामविकास विभागात १० हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"