Maharashtra Politics: शीतल म्हात्रे प्रकरणात नवा ट्विस्ट! राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही? नव्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:43 PM2023-03-14T12:43:49+5:302023-03-14T12:44:46+5:30
Maharashtra News: मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा सन्मान मातीत मिळेल, असे सांगत ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली.
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा मॉर्फ केला असल्याचे सरकारतर्फे विधानसभेत सांगण्यात आले. यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एका दाव्यावरून खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. फक्त सुर्वे आणि म्हात्रे यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर तो इतरांनी सोशल मीडियावर व्हायरल केला, असे सांगत यामागे ठाकरे गट असल्याचे सूचित करण्यात आले. यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी नवा दावा केला आहे.
राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही?
तो व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरही लाइव्ह होता. मग त्यांना का अटक केली नाही? असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्या रॅलीचा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या अकाऊंटवर लाइव्ह होता. त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली. त्यामुळे अटक करायची होती तर त्यांना करायची होती. मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा जो सन्मान आहे तो मातीत मिळेल. सायबरचे काम आहे तपासण्याचे ते करतील, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे. निकाल हा आमच्या बाजूने लागणार, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या वकिलांनी चांगला युक्तिवाद केला आहे. बंडखोर आमदारांनी १० व्या शेड्युलचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ते अपात्र होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्यावरही सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंना मिळेल. शिंदे गटाने काहीही केले तरी त्यांच्या कपाळवरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ते हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम करत आहेत. लोक यांना निवडणुकीत उत्तर देतील, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"