“PM मोदी अन् CM शिंदेंचे पासपोर्ट जप्त करा, देश सोडून पळून जाणार आहेत”; राऊतांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 10:23 AM2023-11-19T10:23:03+5:302023-11-19T10:24:06+5:30
Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: २०२४ पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा. कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत आणि मी सांगतो ते घडते, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. एका कार्यक्रमात बोलताना, ४ काय ४०० गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक त्यांच्यावर भारी पडेल. ही शिवसेना या महाराष्ट्राची आहे. मुंबईची रक्षक आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही यांचा डाव हाणून पाडू, असा एल्गार संजय राऊत यांनी केला.
जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले आहेत ते याच मातीत गाढले गेले आहेत. तसेच दोन गुजराती नक्कीच गाढले जातील. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा या आपल्या घरापर्यंत आली असती. आपले गुजराती माणसाशी भांडण नाही. आपले गुजरातचे भांडण नाही. पण आमच्या वाट्याचे उद्योग तिकडे नेण्याला आमचा विरोध आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
शिंदे गटाला जनता माफ करणार नाही, गद्दारीला थारा नाही
शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देताना, शिंदे गटाला जनता माफ करणार नाही. गद्दारीला थारा नाही. ४० आमदारांना जनता धडा शिकवेन. त्यांना घरात बसवेल. कायद्याचा लढा त्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्र तोडण्याचे, महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले जात आहे. बाळासाहेब असते तर असे करण्याची हिंमत कुणाची झाली नसती. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी आव्हान दिले.
दरम्यान, सामना रोखठोक सदरातूनही संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देशात निवडणूक आयोग हा आज मोदी-शहा निवडणूक आयोग बनला आहे. सर्व घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. त्यातून निवडणूक आयोगही सुटला नाही. पंतप्रधान बजरंग बलीच्या नावाने मते मागतात. अमित शहा मध्य प्रदेशातील मतदारांना मोफत अयोध्यावारीचे प्रलोभन दाखवतात. पुलामातील जवानांचे हौतात्म्य हा प्रचाराचा मुद्दा भाजपकडून होतो. हे गंभीर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.