Sanjay Raut: “चुंबनावरुन SIT अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, ही राज्याची शोकांतिका”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:45 AM2023-03-21T11:45:14+5:302023-03-21T11:45:51+5:30
Sanjay Raut: शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना टीकास्त्र सोडले. एका चुंबन प्रकरणावरून SIT स्थापन होते. तर माग बार्शीतील गरीब मुलीवर कोयत्याने निर्घृणपणे हल्ला झाला, त्यावरून काहीच कारवाई होत नाही. त्यावर बोलले तर माझ्यावर, एका खासदारावर, पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, ही राज्याची शोकांतिका आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कुणाला तरी विकायची आहे, म्हणून मोठा सौदा केला जातो. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. एका फुटलेल्या गटाच्या हातात शिवसेना दिली जाते. हेही इतिहासात घडले नव्हते. देशातील लोकशाही संपतेय म्हणून असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची संसदेतील मेंबरशिपच रद्द करावी, अशी मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती, असे सांगत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो, गरीबांना मिळत नाही
गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अनेक ठिकाणी त्याचा पुरवठा झालेला नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारला सुनावले. दिवाळीचा शिधाही मिळालेला नाही. शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, ज्या मुलीवर कोयत्याचे वार झालेत. तिची आई माझ्याशी बोलली. मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी ती सरकारकडे करत आहे. पारधी समाजातील ही मुलगी आहे. बार्शीतल्या गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय योग्य माध्यमातून पोहोचवला. त्या मुलीवर झालेल्या इतर अत्याचाराविषयी कोणताही उच्चार केला नाही, त्यात माझे काय चुकले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"