“अद्वय हिरेंची अटक हे राजकीय दबाव तंत्र, शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी आहे”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:42 AM2023-11-16T10:42:00+5:302023-11-16T10:43:11+5:30

Sanjay Raut News: अद्वय हिरेंनी मालेगाव विधानसभा निवडणुक लढू नये, यासाठी राजकीय दबाव होता. हिरे झुकले नाहीत, त्यांना अटक झाली, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

shiv sena thackeray group mp sanjay raut reaction after leader advay hiray arrest | “अद्वय हिरेंची अटक हे राजकीय दबाव तंत्र, शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी आहे”: संजय राऊत

“अद्वय हिरेंची अटक हे राजकीय दबाव तंत्र, शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी आहे”: संजय राऊत

Sanjay Raut News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले. हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. त्यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. हिरे हे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला आहे. यातच संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, लढत राहू आणि जिंकू, असे म्हटले आहे. 

शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी आहे

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे. नाशिक जिल्हा बँकेचे ७ कोटी रुपयांचे हे कर्ज प्रकरण. गिरना मौसम साखर कारखान्याचे १७८ कोटीच्या अफरातफर प्रकरणात मंत्री दादा भुसे अडकले पण कारवाई नाही. भीमा पाटस साखर कारखाना दौंड येथे ५०० कोटीचे money laundering. पण भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई नाही. मंत्री मंडळात अनेक भ्रष्ट लोक जामिनावर आहेत. सहकारी बँकाचे अनेक थकबाकीदार सरकारात आहेत. अद्वय हिरे यांनी मालेगावात सक्रिय राहू नये. मालेगाव विधानसभा निवडणुक लढू नये, यासाठी राजकीय दबाव होता. हिरे झुकले नाहीत. त्यांना अटक झाली. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. लढत राहू आणि जिंकू.जय महाराष्ट्र!, असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आहे. या प्रकरणी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. बँकेची ही केस सुमारे आठ वर्षे जुनी आहे.


 

Web Title: shiv sena thackeray group mp sanjay raut reaction after leader advay hiray arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.