“हिंमत असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; ठाकरे गटातील नेत्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 04:46 PM2023-08-06T16:46:36+5:302023-08-06T16:54:05+5:30
Thackeray Group Vs BJP: अरामको कंपनीची दलाली घेतल्यासारखे देवेंद्र फडणवीसांनी विधान केले. त्याचा धिक्कार करतो, अशी टीका ठाकरे गटातील नेत्याने केली आहे.
Thackeray Group Vs BJP: बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. यावर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. बारसू रिफायनरीला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांबरोबर जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असून, पाकिस्तानला तिचा फायदा होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्याने पलटवार करताना देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याचे जाहीर आव्हान दिले आहे.
राज्य सरकारकडून विलंब झाल्याने कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. तरीही केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प केला जाईल. सरकारला तेलशुद्धीकरण प्रकल्प गावकऱ्यांना डावलून करायचा नाही. ज्यांना देशाचा विकास नको आहे, असे लोक या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही तिच माणसे आहेत की जी ‘आरे’, ‘ बुलेट ट्रेन’, या प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होती. काही माणसे ‘नर्मदा’ आंदोलनात ही सहभागी होती. ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात. त्यांच्या बँक खात्यावर भारतात बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ या संघटनेकडून पैसे येतात, असा मोठा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
हिंमत असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
अरामको कंपनीची दलाली घेतल्यासारखे देवेंद्र फडणवीसांनी विधान केले आहे. त्याचा मी धिक्कार करतो. हिंमत असेल तर गृहमंत्रीपदाचा वापर करून बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला बंगळुरूतून पैसे मिळतात, त्याचे नाव जाहीर करा. जर, हिंमत नसेल, तर विधानपरिषदेत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.
दरम्यान, नाणार असो की बारसू असो… भाजप महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतेच. त्याबरोबरच दिसते ते शिंदेंच्या सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणे! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग’ अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत. उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. स्वतःचे खोटे रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला होता.