Maharashtra Politics: “फक्त मराठी माणूस ‘ईडी’च्या रडारवर, किरीट सोमय्या, मोहित कंबोज, रवी राणांचे कारस्थान”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 09:34 AM2023-01-13T09:34:49+5:302023-01-13T09:37:26+5:30
Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले, असा दावा करत ठाकरे गटाने भाजपवर सडकून टीका केली आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय यंत्रणांची राज्यातील अनेक नेत्यांवर धडक कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस बजावली. यातच आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेलेले मात्र, नंतर ठाकरे गटात परतलेले आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि त्यातही ईडीच्या रडारवर आहे. यामागे भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांचे कारस्थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
सुरत येथून माघारी परतल्याच्या प्रसंगावरही नितीन देशमुख यावेळी बोलले. मी तेव्हा नागपुरात कसा पोहोचला हे मलाच माहीत आहे. तेव्हा सुरतला मला हृदयविकाराचा झटका आल्याचे कुणी म्हणाले, तर कुणी माझ्या घातपाताच्या अफवा पसरवल्या, असे नमूद करताना हृदयविकाराचा झटका आला असेल तर मी तीन दिवसांत नागपुरात कसा पोहोचेन, असा सवाल करत नितीन देशमुख नशेत धुंद होते, अशा बातम्या गुजरातमधील वर्तमानपत्रात छापून आणल्या गेल्या, पण त्यात काहीही तथ्य नाही. माझी डीएनए तपासणी करा. त्यात जर नशा करत असल्याचे आढळले तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान देशमुख यांनी दिले.
आपल्याकडे सैन्य अफाट आहे, ही निवडणूक युक्तीने लढवली पाहिजे
सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आमच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले. आपल्याकडे सैन्य अफाट आहे, पण आपल्याला ही निवडणूक युक्तीने लढवली पाहिजे, असे मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच आमदारांना मदत केली असे दावे करता, पण मदतीच्या नावाखाली आमदारांचे शोषण केले जात होते, असा आरोप करताना शिवसेना फोडण्याचे भाजपचे षड्यंत्र दोन वर्षांपासून सुरू होते आणि हे षड्यंत्र भाजपच्या बिरबलाने केले, अशा शब्दांत देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना काही दिवसांपूर्वी एसीबीची चौकशीसाठी नोटीस आली. माझ्याविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवर झालेले संभाषण काय आहे, हे संभाषण व्हायरल करणार असल्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"