“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:05 PM2023-06-14T12:05:14+5:302023-06-14T12:05:45+5:30
Sanjay Raut: हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut: वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून विरोधक आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी याबाबत सारवासारव करायला सुरूवात केली असताना भाजप नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षात सगळे काही आलबेल नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली, असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. यावरून नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यानंतर मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो असलेली जाहिरात देण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो देण्यात आले आहेत. यावरून संजय राऊतांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली
आधीच्या जाहिरातीवरून आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता भाजपच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकलेली दिसते. पडद्यामागे काय गोष्टी घडल्यात हे मला माहिती आहे. जाहिरातीचा प्रकार हा सगळा हास्यास्पद प्रकार झाला. त्यांच्या मनात काय ते यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर आता नवीन जाहिरातीत चित्र बदलेले असले तरी प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, हे स्पष्ट दिसत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रॉक्सी वॉर सुरू झाले आहे. सरकार कोसळेपर्यंत ते तसेच राहील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यापासून पळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निकाल द्यावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. शिवसेना शिंदे गटातील मंत्री सर्व काही ठीक आहे, असे जे दाखवत आहेत, ते उसने अवसान आहे. भविष्यात काय होणार, हे त्यांनाही माहिती आहे, असेही ते म्हणाले.