“भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का?”; संजय राऊतांची अमित शाहांच्या आश्वासनावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:26 AM2023-11-14T11:26:49+5:302023-11-14T11:27:31+5:30
Sanjay Raut Vs Amit Shah: निवडणूक प्रचारात रामलल्लांचा वापर करत आहे. निवडणूक आयोग खरेच जीवंत असेल, तर भाजपवर कारवाई करायला हवी, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
Sanjay Raut Vs Amit Shah: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. काही दिवसांनी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मध्य प्रदेशात प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्व पक्षांनी जोर लावल्याचे दिसत आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील एका सभेला संबोधित करताना दिलेल्या आश्वासनावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का, असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यास नागरिकांना मोफत रामलल्लांचे दर्शन करण्यास नेण्याचे आश्वासन देत आहेत. हे मोफत, ते मोफत असे भाजपचे सुरू होते. आता रामलल्लाही मोफत असे झाले. रामलल्ला देशाचे आणि संपूर्ण विश्वाचे आहेत. मात्र, ते निवडणूक प्रचारात रामलल्लांचा वापर करत आहेत. याचा अर्थ मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपला पराभूत केले, तर रामलल्लांच्या दर्शनाला गेलेल्या मध्य प्रदेशच्या नागरिकांना अडवणार का, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का?
निवडणूक प्रचारात भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये होत आहेत. भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का? की रामलल्लांनी भाजपला नियुक्त केले? हा फार गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग खरेच जीवंत असेल, तर त्यांनी या मुद्द्यावर भाजपवर कारवाई करायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपला मतदान केले तर रामलल्लांचे दर्शन मोफत, नाहीतर पैसे द्यावे लागतील, दर्शन देणार नाही, असे राजकारण देशात सुरू आहे. रामलल्लांवरही मोदी सरकारने कर लावला. औरंगजेबाच्या काळात धार्मिक गोष्टींवर जिझिया कर लावला जायचा. आता भाजपने रामलल्लांवर कर लावला. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.