“महाराष्ट्र खदखदतोय, पण फडणवीस गप्प, गृहमंत्री म्हणून १५ दिवस...”; संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:18 AM2023-11-18T11:18:08+5:302023-11-18T11:18:48+5:30
Sanjay Raut News: गृहमंत्र्यांना या गोष्टीकडे पाहायला वेळ आहे का? ते आता छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात कुठेतरी असू शकतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. तर अनेक नेत्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांना या गोष्टीकडे पाहायला वेळ आहे का? सध्या ते छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान इथे कुठेतरी असू शकतात. गृहमंत्र्यांनी सलग १५ दिवस महाराष्ट्रात थांबून मुंबईसह राज्याची कायदा-सुव्यवस्था व इतर प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त राजकीय विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्यापुरते गृहमंत्रीपद नाही. ते राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी असते, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले असताना दुसरीकडे छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी लावून धरली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हाराष्ट्र खदखदतोय. हे चित्र देशासाठी चांगलं नाही. राज्यात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. महाराष्ट्र सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला. पुरोगामी महाराष्ट्र जातीपातींमध्ये विभागलेला दिसत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आरक्षणाचा विषय गंभीर आहे. यावरून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात गट पडलेत हे स्पष्ट आहे. मागेही म्हणालो होतो की, एकमेकांच्या अंगावर आलेत. मंत्रिमंडळात गँगवॉर आहे, हे बोललो ते सत्य होते. वरिष्ठ मंत्री यावर एकमेकांशी चर्चा करायला तयार नाहीत. मुख्यमंत्री, गृहमंत्री मूग गिळून गप्प आहेत. कुणाची काय भूमिका आहे आम्हाला माहिती नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.