Maharashtra Politics: “शिक्कामोर्तब! आधीच सांगत होतो, आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:59 PM2023-03-15T12:59:01+5:302023-03-15T12:59:57+5:30
Maharashtra News: जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहेत. यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२३ च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचे कौतुक केले आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) या वर्षासाठी जगातील ४० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांच्या यादीची घोषणा केली आहे. या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ १०० तरुणांची निवड करण्यात आली आहे. यात १२० देशांतील १ हजार ४०० सदस्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंच्या या यादीतील समावेशावरून संजय राऊत यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य आहे हे मी आधीच सांगत होतो. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा या यादीत समावेश होणे हा महाराष्ट्राचा गौरव आहेच. पण देशाचाही गौरव आहे. देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे देशाला ऑस्कर मिळालं. तसेच जगातील शक्तीशाली तरुण नेतृत्वात आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला. मंत्री म्हणून आणि राजकीय नेता म्हणून आदित्य ठाकरे यांनी ठसा उमटवला आहे. जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे. आम्ही आनंदीत आहोत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे आणि राज्याचे भवितव्य आहेत, हे मी वारंवार सांगतो होतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार किंवा शिवसेना असेल प्रत्येकाबाबत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. फक्त ठाकरे परिवाराला लक्ष्य केलं जात आहे. या राज्याचे प्रशासन आणि राजकारण सुरू आहे. न्यायालयातील न्याय मेला नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अजूनही न्यायाची अपेक्षा आहे. ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा कट रचला त्याचे सूत्रधार कोण माहिती आहे. तरीही आम्ही प्रकरण शांतपणे हाताळले. खोकेवाल्यांचा हिशोब मागितला पाहिजे. ते आमचा हिशोब मागत आहे. तुम्ही कोणताही हल्ला करा. कायदेशीर असो की बेकायदेशीर आम्ही हल्ला परतवून लावू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"