Maharashtra Politics: “महाराष्ट्राच्या राजकारणासाठी क्रांतीकारक पाऊल, अजून बरंच काही घडणार”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:54 PM2023-01-23T14:54:25+5:302023-01-23T14:57:49+5:30
Maharashtra News: आघाडी अधिकच मजबूत होईल. महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होती. या युतीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीसंदर्भात भाष्य केले.
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र येत आहेत. ही तर सुरुवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरेच काही घडणार आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न होते. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात. दोन शक्ती एकत्र याव्यात, असे संजय राऊत म्हणाले.
महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही
कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे. पण त्यात तथ्य नाही. ठाकरे-आंबेडकर युती ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबूत होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहतील. ते आजही आहेत. उद्याही राहतील. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारले आहे. त्यामुळेच तेच पक्षप्रमुख राहतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जातेय. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आलोय असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"