Maharashtra Politics: “संभाजीराजे एक प्रगल्भ नेते, भाजपच्या नादाला कुठे लागलेत”; संजय राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:04 PM2022-12-19T14:04:24+5:302022-12-19T14:05:06+5:30
Maharashtra News: असे विराट मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचे अशी भाजपची प्रथा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाचे काम स्थगित करण्यात आले आहे. मात्र, अन्य मुद्द्यांवरून राजकीय नेतेमंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चाच्या गर्दीवरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महामोर्चा विराट दाखवण्यासाठी मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरण्यात आला. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा किती विशाल होता हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट केला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून, मराठा मोर्चाचा असल्याचे सांगितले. यानंतर संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले. यानंतर आता संजय राऊत यांनी संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिले.
संभाजीराजे एक प्रगल्भ नेते, भाजपच्या नादाला कुठे लागलेत
माझ्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली. संभाजीराजे एक प्रगल्भ नेते आहेत. आमचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आहे. हे भाजपच्या नादाला कुठे लागलेत आणि मोर्चा-मोर्चा, आमचा मोर्चा मोठा की तुमचा मोर्चा मोठा असे कुठे म्हणत आहेत. सगळे मोर्चे आपलेच आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा घेऊन उभे आहोत. मग आपण सगळे त्यावरच बोलुयात. इतकच मी छत्रपतींना आवाहन करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी तो व्हिडिओ महाविकासआघाडीचा असल्याचे कुठेच म्हटलेले नाही. तुम्ही ते ट्वीट काळजीपूर्वक पाहा. त्यात मी कुठेही दावा केलेला नाही की, हा महाविकासआघाडीचा मोर्चा आहे. मराठा मोर्चालाही हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते. मात्र, तो मोर्चाही प्रचंड मोठा होता. असे विराट मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचे अशी भाजपची प्रथा आहे. त्यावरच मी टीका केली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"