“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:29 AM2023-11-24T11:29:51+5:302023-11-24T11:33:45+5:30
Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे.
Sanjay Raut News: महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्ये डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही बॅनर राजस्थानात लावण्यात आले होते. यावेळी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजस्थान भाजपला महाराष्ट्रात काय चालले आहे, हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील. महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजले जाते ते बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करतात. हिंदुहृदयसम्राट या देशात दोनच आहेत, एक स्वातंत्र्यीवर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर कुणीही ही पदवी घेऊ शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष आणि काम खूप मोठे होते, या शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.
गद्दारांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा
एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील पण त्यांनी असे काय महान कार्य केले आहे ते आम्हाला पाहावे लागेल. सन्मानीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पाहावे लागेल, या शब्दांत संजय राऊत हल्लाबोल केला.
दरम्यान, चार दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावे लागले. याबाबत कुणीही संवदेना व्यक्त केली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेसमुक्त भारत आणि शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा होता पण ते झाले नाही. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.