“मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश, लोकशाही विजयी होईल, ‘इंडिया’ जिंकेल!”; ठाकरे गट ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 08:19 AM2023-09-02T08:19:22+5:302023-09-02T08:21:25+5:30
INDIA Alliance Meeting Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंनी यजमानपद भूषवलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीने अनेक जळमटे दूर केली. एक दिशा स्पष्ट झाली, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
INDIA Alliance Meeting Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरे यांनी यजमानपद भूषवलेल्या या बैठकीने अनेक जळमटे दूर केली. एक दिशा स्पष्ट झाली. आपण एकत्र आलो नाही तर हुकूमशहा आपल्याला गिळून टाकील. आधी देश वाचवायला हवा ही भावना राष्ट्रभक्त पक्षांत निर्माण झाली. ‘इंडिया’ आघाडीचे युद्ध त्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापि संपलेले नाही, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटले आहे.
हुकूमशहा हा माथेफिरूच असतो. त्याने घेतलेल्या निर्णयांत सुसंगती नसते. सिंहासन हलवले जात आहे या भयाने तो अधिक बेफामपणे वागतो व निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे. हुकूमशहा देशाचे आराध्य दैवत श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेने शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमनप्रसंगीच हुकूमशाहीचे शिंग फुंकले. मुंबईत देशाच्या राजकारणातील २८ प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते दोन दिवस एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच. मुंबईत इंडिया गटाच्या बैठकीने देशात कोणता संदेश गेला? तर एकच संदेश तो म्हणजे, ‘राजा घाबरला व सिंहासन टिकविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल.’, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून इंडिया बैठकीचा आढावा घेताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
ऐन गणेशोत्सवात असे विशेष अधिवेशन बोलावून काय साध्य करीत आहेत?
आता आपल्या राजकीय विरोधकांना घाबरलेले पंतप्रधान मोदी कोणती लोकशाहीविरोधी पावले उचलतात ते पाहू. इकडे इंडियाची बैठक सुरू असताना संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करून खळबळ माजवायचा प्रयत्न मोदी सरकारने केला; पण खळबळ काय, साधा बुडबुडाही फुटला नाही. ऐन गणेशोत्सवात असे विशेष अधिवेशन बोलावून मोदी काय साध्य करीत आहेत? महाराष्ट्रावर त्यांचा दात आहेच व ते गणपतीचे आगमनही निर्विघ्न पार पाडू देत नाहीत. ऐन गणपतीत महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीत येऊन मोदींची प्रवचने ऐकायची? बरे, ते प्रवचने झोडायला संसदेतही येत नाहीत. आता लोकांना गणेशोत्सवही ते साजरा करू देणार नाहीत. ही एक विकृतीच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक भावनांचा अपमान केला
गणेशोत्सवाच्या धामधुमीत त्यांनी संसदेचे विशेष सत्र बोलावून महाराष्ट्राच्या सार्वजनिक भावनांचा अपमान केला व इंडिया आघाडीसही अपशकून करण्याचा प्रयत्न केला.मोदी काळात तर स्वातंत्र्य उरलेले नाहीच, परंतु सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातही आपली पीछेहाट होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींची धार्मिक लोटांगणे वगैरे सगळे ढोंग आहे. देश पुन्हा धर्माच्या गुंगीत अडकवून तरुण पोरांना दंगेखोर बनवायचे व देशाची सर्व संपत्ती आपल्या दोस्त मंडळींना लुटण्याची मुभा द्यायची, हे आजचे चित्र आहे. त्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी उभी ठाकली आहे, असा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला.
दरम्यान, देशातील प्रश्नांवर रान उठवावे लागेल, जागावाटपाचा तिढा राज्याराज्यांत शांतपणे सोडवावा लागेल. एक राष्ट्रीय कार्यक्रम ठरवून जनतेसमोर जावे लागेल. आता बैठका नकोत, तर लोक आंदोलनाच्या जाहीर सभा राज्याराज्यांत घ्यायला हव्यात. देशात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा आहे. केंद्राच्या ‘कॅग’ अहवालात ते स्पष्ट झाले. या डोंगराच्या पायथ्याशी मोदींचे सरकार व शिखरावर मोदींचे मित्रमंडळ आहे. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली.