“पहिल्या पावसात सरकार वाहून गेले, राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:12 AM2023-06-27T08:12:35+5:302023-06-27T08:13:18+5:30
Shiv Sena Thackeray Group News: शेतकऱ्यांना आणि मुंबईकरांना पोकळ दावे, निष्फळ वादे यात झुलविण्याचेच उद्योग सुरू आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena Thackeray Group News: रखडलेल्या मान्सूनने अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपायदेखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे. आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही. पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी काय करता?’ असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका, असा इशारा ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारला सामना अग्रलेखातून दिला आहे. पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात शिंदे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे दिसले
मुंबईत एका तासात ७० मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे शिंदे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले. ७० मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. तुमचे काम चोख असते तर पहिल्याच पावसात १२०० तक्रारी करण्याची वेळ सामान्य मुंबईकरांवर आलीच नसती, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, जनतेला तक्रारी का कराव्या लागल्या यावर सरकारने चिंतन करायला हवे. पाणी तुंबणे आणि इतर गोष्टींबाबत आपण केलेल्या वल्गना पहिल्याच पावसाने पोकळ का ठरल्या, आपल्या कारभाराचे पितळ ७० मिलीमीटर पावसाने उघडे कसे पाडले याची लाज सरकारला वाटायला हवी. पहिल्याच पावसाने तुमच्या दाव्यांचे झालेले वस्त्रहरण हे तुमचेच पाप आहे. निदान यापुढील काळात तरी ते कसे झाकता येईल आणि मुंबईकरांना कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार करा. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे. तिकडे शेतकऱ्यांना आणि इकडे मुंबईकरांना पोकळ दावे आणि निष्फळ वादे यात झुलविण्याचेच उद्योग सुरू आहेत, या शब्दांत ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.