Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:10 AM2023-04-11T09:10:59+5:302023-04-11T09:11:38+5:30

Maharashtra News: चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येहून आल्यावर आता सरकार बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

shiv sena thackeray group slams shinde and thackeray govt over farmer damage due to unseasonal rain | Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

googlenewsNext

Maharashtra Politics: गारपिटीचे तडाखे आणि अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा भयंकर धुमाकूळ सुरू आहे. गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतांमध्ये गारांचा खच पडला आहे. कश्मीर वा हिमाचलमध्ये हिमवर्षावानंतर जशी बर्फाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसते, तशी अवस्था उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

नाशिक, नगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तर या गारपिटीचे रूप अधिकच रौद्र होते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिके व फळबागांची मोठी हानी झाली. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.  

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

सतत येणाऱ्या अवकाळीच्या तडाख्याने मका, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले. गोळीबाराचा वर्षाव व्हावा, अशी गारपीट झाल्याने शेतातील कलिंगड व खरबुजांच्या चिंधडय़ा उडाल्या. द्राक्ष बागा कोलमडून पडल्या. द्राक्षांबरोबरच केळी व संत्र्याच्या बागांचेही अवकाळी पावसाने अपरिमित नुकसान झाले आहे. कोकणातही जांभूळ, काजू, कोकम, आंब्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दिलेला हा तिसरा फटका आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱयांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय?

जे उगवले, पिकले ते निम्म्याहून अधिक अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात उद्ध्वस्त होते आणि जे पीक हाती आले त्याला भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था झाली आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी नियम व फायलींच्या प्रवासात कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱयांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱयावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱयांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाने शिंदे आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: shiv sena thackeray group slams shinde and thackeray govt over farmer damage due to unseasonal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.