“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 08:01 AM2024-03-30T08:01:10+5:302024-03-30T08:01:35+5:30
Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले.
Sushma Andhare News:महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, हे फक्त जाणूनबुजून दाखवले जात. छोटे मोठे वाद होते ते मिटतील. ठाण्यात आतापर्यंत इतक्या केसेस टाकल्या तरी शिवसैनिक मागे हटला नाही. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे. ठाण्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीला उभे राहिले, तरी विजय आमचाच होणार. आम्हीच जिंकणार. नरेंद्र मोदींनी ठाण्यात अर्ज भरावा, पण विजय राजन विचारे यांचाच होईल, या शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
मीडियाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी महाविकास आणि महायुतीच्या जागावाटप तसेच उमेदवारीवर थेट शब्दांत भाष्य केले. महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर केलेल्या आरोपांना स्पष्टपणे उत्तरेही दिली. वंचित बहुजन आघाडीची मुंबईत सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना निमंत्रण का दिले नाही? इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण त्यांना दिले तेव्हा प्रतिसाद दिला नाही. मनुवादी विचारांविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे पाईक म्हणून प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे ही अपेक्षा आहे. आम्ही ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव पाठवला होता, असे सुषमा अंधारेंनी सांगितले.
अकोला, रामटेकची जागा काँग्रेसला गेल्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेकडे
सांगलीसाठी काँग्रेस इच्छुक आहे हे सर्वश्रुत आहे. अकोला आणि रामटेकची जागा काँग्रेसला गेल्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेकडे आली. तसेच स्मृती इराणी, कंगना रणौत, नवनीत राणा हे चित्रपट क्षेत्रातून आलेत, त्यामुळे व्यवसायावरून कोणी कोणावर टीका करू नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तर, विजय शिवतारे यांचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे, याचा शोध अजित पवारांनी घ्यावा. विजय शिवतारे यांचे स्क्रिप्ट रायटर आजूबाजूला बसलेले आहेत का हे पाहावे. विजय शिवतारे यांचा यू टर्न म्हणजे तारे जमीन पर अशातला प्रकार आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
मुंबईत आमची ताकद, प्रत्येक जागेवर आम्ही दावा करतो
कल्याणमध्ये माझे नाव चर्चेत आले. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचे नाव अद्याप जाहीर केले नाही. जो कुणी उमेदवार असेल त्याच्याविरोधात ताकदीने आम्ही लढू. ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. मुंबईत आमची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक जागेवर आम्ही दावा करतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत. संजय राऊतांनी जे सोसलं, भोगलं आणि जे पक्षासाठी योगदान दिले ते क्वचितच इतर पक्षात बघायला मिळते. जर शिंदे गट किंवा फुटलेल्या राष्ट्रवादीकडे एकतरी संजय राऊत असता तर त्यांनी जेल भोगायची तयारी ठेवली असती. पक्षासाठी जेलमध्ये जाणारे संजय राऊत आहेत. संजय राऊतांवर टीका करणे ही अनेकांची फॅशन झाली आहे. काहीही झाले तरी संजय राऊत असे भाजपाचे होते, भाजपाची ही लाईन शिंदे गटाच्या बोलघेवड्यांनी चालवली. निष्ठेचे दुसरे नाव म्हणजे संजय राऊत आहेत, असे कौतुकोद्गार सुषमा अंधारे यांनी काढले.