Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:44 PM2023-01-17T15:44:25+5:302023-01-17T15:46:28+5:30
Maharashtra News: पक्षप्रमुखपदासंदर्भात केलेल्या दाव्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला कायदाच दाखवला.
Maharashtra Politics: शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत, निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का, अशी विचारणा केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे. संजय शिरसाटसारखा माणूस असे सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलेय का? निवडणूक आयोग तुमच्या घरचे आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे
जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार सांगते की, एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचे हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरते. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे. अंधेरी पूर्वच्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहोत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही मतांची टक्केवारी आपलीच आहे. ते निवडणुकीलाच कधी सामोरे गेलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी कुठे आहे त्यांच्याकडे? हा कायद्याचा पेच आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"