Maharashtra Politics: “नारायण राणेंना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल”; ठाकरे गटाने डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:24 PM2023-01-28T17:24:05+5:302023-01-28T17:24:53+5:30
Maharashtra News: नारायण राणे माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव होईल, असा मोठा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.
Maharashtra Politics: टीम-मोदीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा फेरबदल होऊ घातला आहे. मोदी आपल्या वॉर-टीमला अंतिम स्वरूप देत असून, कमी कार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. तुमच्या कार्यक्षमतेवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे मोदींनी मंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्याने नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायणे राणे यांचा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असून, नारायण राणे जर माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव करेन, असा मोठा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला जनता कंटाळली
आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास देशाचा मूड काय, कोणाला किती जागा मिळतील, याबाबत जनमत चाचणीचा सर्व्हे घेण्यात आला. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, हा सर्व्हे बरोबर आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार औट घटकेचे असून भाजपच त्यांचे विसर्जन करणार, अशी घणाघाती टीकाही विनायक राऊत यांनी केली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयम पाळण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला राऊत यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"