सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:41 PM2019-12-18T18:41:17+5:302019-12-18T19:02:35+5:30
किरीट सोमय्यांची शिवसेनेवर जोरदार टीका
मुंबई: भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. याबद्दलचं पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहसचिवांना दिलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. मात्र शिवसेनेची दादागिरी रेकॉर्डवर यावी यासाठी राज्यपालांना आणि गृह सचिवांना पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला पुन्हा एकदा होऊ शकतो, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात आल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. 'किरीट सोमय्याला कधी भीती वाटली नाही आणि यापुढेही वाटणार नाही. मी अनेकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात काम यापुढेही सुरुच राहील,' असं सोमय्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.
सत्तेत आल्यानंतर लगेचच शिवसेनेची दादागिरी सुरू झाली आहे. त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची नोंद कागदोपत्री व्हावी यासाठीच गृह सचिव आणि राज्यपालांना पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यावेळी दोन बस भरुन माणसं आली होती. त्यांच्या हल्ल्यात भाजपाच्या ७ महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या होत्या. त्या जवळपास आठवडाभर रुग्णालयात होत्या, असं सोमय्या यांनी सांगितलं.
शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यामधील विळ्या भोपळ्याचं सर्वश्रुत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपाची युती तुटली होती. त्यावेळी सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार चालतो, असे घणाघाती आरोप त्यांनी केले होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर वांद्र्याचा माफिया अशी टीका केली होती. त्यानंतर सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढत गेली. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. यानंतर भाजपानं सोमय्यांचं तिकीट कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती.