भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत

By admin | Published: June 21, 2016 01:26 AM2016-06-21T01:26:09+5:302016-06-21T01:26:09+5:30

मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यामुळे काळ्या यादीत टाकलेल्या जे. कुमार आणि आर. पी. एस. या ठेकेदारांच्या ठाणे शहरात सुरू असलेल्या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट करून घेतल्यावर कामाचा दर्जा

Shiv Sena in trouble with BJP | भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत

भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत

Next

ठाणे : मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यामुळे काळ्या यादीत टाकलेल्या जे. कुमार आणि आर. पी. एस. या ठेकेदारांच्या ठाणे शहरात सुरू असलेल्या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट करून घेतल्यावर कामाचा दर्जा उत्तम असेल तरच त्यांची बिले देण्याचा आदेश महापौर संजय मोरे यांना सोमवारी महासभेत द्यावे लागले. या दोन्ही कंत्राटदारांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद असल्याने आता मुंबई पाठोपाठ ठाण्यातही शिवसेना घोटाळ्यामुळे जात्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे मुंबई बरोबरच ठाण्यातही भाजपानेच सेनेला अडचणीत आणण्याचे उद्योग आरंभले आहेत.
ठाणे महापालिकेच्या महासभेत विरोधकांसह शिवसेनेचा मित्र असलेल्या भाजपाने मुंबईतील रस्ते कंत्राटदारांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे मित्रपक्षाच्या या घरच्या आहेरामुळे या ठेकेदारांना आता महापालिका हद्दीत कोणतेही नवीन कामे न देण्याचा निर्णयही महापौरांना जाहीर करावा लागला.
मुंबई महापालिकेने ज्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे, त्यांची नावे जाहीर करण्याची आणि त्यांची कोणती कामे सुरु आहेत, याची माहिती भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर मागितली. मुंबईत भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रस्ते कंत्राटामधील घोटाळा लावून धरला होता.
रस्ते कंत्राटावरून भाजपा आपल्याला अडचणीत आणणार याची कल्पना असल्यामुळेच की काय शिवसेनेने ठाण्यातही या ठेकेदारांच्या कामांची चौकशी करण्यासाठी अगोदरच समिती नेमली. पाटणकर यांनी ठेकेदारांची नावे जाहीर करण्याची मागणी लावून धरल्यामुळे महापालिकेचे प्रभारी नगर अभियंता रतन अवसरमोल यांनी सांगितले की, जे. कुमार, महावीर, रेनकॉन, आर. के. मदानी, आर. पी. एस इन्फ्रास्ट्रक्चर, आर. के. कन्स्ट्रक्शन यांना मुंबईत काळ्या यादीत टाकले आहे. त्यापैकी जे. कुमार यांच्याकडे कळवा खाडीपुलाच्या डिझाईनचे आणि पुलाचे काम आहे. घोडबंदर रोड येथील पादचारी पुलाचा आराखडा आणि पुल उभारणे, ही कामे सुरु आहेत. तर आ.पी.एस ला आनंद नगर आणि ज्युपिटर येथे पादचारी पुलाचे कामे देण्यात आली आहेत. त्यातील आनंद नगर पुलाचे काम पूर्ण झाले आहे तर पोखरण रोड नं. १ देवदया नगर ते येऊर या रस्त्याच्या कामाच्या निविदाही त्यांनी भरल्या आहेत.
नगर अभियंत्यांच्या खुलाशामुळे विरोधक आक्रमक झाले आणि मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना काम का दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी शहरात काही ठिकाणी या ठेकेदारांमार्फत झालेली रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचा आरोप सदस्यांनी केला. सेनेचे माजी महापौर हरिशचंद्र पाटील यांनीही भाजपाच्या सूरात सूर मिसळत कापुरबावडी येथील रस्त्याचे काम कसे निकृष्ठ दर्जाचे झाले, त्याचा पुरावाच सादर केला. आनंद नगर पादचारी पुलाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी अद्यापही येथील अनेक कामे अर्धवट सोडून ठेकेदाराने पळ काढल्याचा मुद्दा नगरसेवक नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.
सेनेतील काही मंडळींची साथ मिळाल्याने भाजपाचे पाटणकर यांनी मित्राला आणखी अडचणीत आणण्यासाठी या ठेकेदारांना शहरातील कोणतीही नवीन कामे देऊ नयेत, जी कामे दिलेली आहेत, त्या कामांचे थर्ड पार्टी आॅडीट करुन त्याचा अहवाल आल्यानंतरच बिल अदा करावे, अशी मागणी केली. त्यांच्या या गुगलीला विरोधकांनीही साथ दिल्याने सेना चांगलीच अडचणीत आली.

भाजपानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिकेत आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच कामे मिळावीत यासाठी आॅनलाईन निविदांमध्ये सिंडीकेट करून भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. याचे पुरावेही सादर करण्याची आपली तयारी असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

तसेच, एखाद्या विशिष्ट ठेकेदारालाच हे काम मिळावे म्हणून निविदा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक हँग करुन ठेवली जाते, असा आरोप केला. आपल्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, अभियंता आदींसह इतर अधिकाऱ्यांचे मोबाईल तपासण्यात यावेत, अशी मागणी केली. या प्रकरणाची देखील चौकशी करण्याचे आदेश महापौर मोरे यांनी दिले.

Web Title: Shiv Sena in trouble with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.