"२०१४ साली मोठे साहेब असते तर...", अंबादास दानवेंचे बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 03:57 PM2024-03-17T15:57:22+5:302024-03-17T15:59:10+5:30
काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली.
आज मुंबईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीतील दिग्गज नेत्यांची सभा पार पडत आहे. काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत 'इंडिया' आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काल त्यांनी चैत्य भूमीला भेट दिली. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. याचाच दाखला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचले.
चंद्रशेखर बावनुळे यांनी बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. त्या आधी या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.
तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचेही स्मारक आहे, ज्यांनी म्हटले होते की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन देखील करत नाही. ते का करत नाहीत, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे आहे का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे. आज या शिवतीर्थावर राहुल गांधी 'न्याय यात्रा' या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे.
२०१४ साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा.
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 17, 2024
याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण २०१४ साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर… https://t.co/d8vopyTkXg
बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, २०१४ साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा. याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण २०१४ साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांच्या लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता.
"त्यांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता", असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.