एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर... ; उदय सामंतांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:30 IST2024-12-05T13:29:56+5:302024-12-05T13:30:34+5:30
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारल्यास या पदावर उदय सामंत विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर... ; उदय सामंतांचं मोठं विधान
Shiv Sena Uday Samant ( Marathi News ) : "मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र शिवसेनेतील इतर ५९ आमदारांपैकी कोणीही या पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेतील इतर नेत्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा सुरू आहे, ती थांबली पाहिजे," अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारल्यास या पदावर उदय सामंत विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी पत्रकार परिषदेतून खुलासा करत ही चर्चा फेटाळून लावली आहे.
"एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही आणि ती जबाबदारी आमच्यातील इतर कोणावर टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांनाच आम्ही नेते मानलं आहे आणि आमचं राजकीय करिअर त्यांच्या हाती सोपवलं आहे," अशा शब्दांत उदय सामंत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.
"ती बातमी खोटी"
उदय सामंत यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन एका मराठी वेबसाइटवर एक वृत्त प्रकाशित झाले होते. "एकनाथ शिंदे हे संघटक म्हणून काम करणार होते. मात्र तुमचा पक्ष विलीन होणार असल्याने तुम्ही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, असं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं," अशा आशयाचं ते वृत्त होतं. मात्र मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसताना माझ्या तोंडी हे शब्द टाकण्यात आले आहेत, असा दावा सामंत यांनी केला आहे.