Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:42 AM2022-10-27T11:42:06+5:302022-10-27T11:42:57+5:30
Maharashtra News: सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते, असा दावा करत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली.
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असून, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तुम्ही किमान धीर तरी द्यावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झाले आहे. शेतकऱ्यांसोबत उभे राहाणे गरजेचे आहे. त्यांना जाऊन धीर देणे एवढे जरी केले तरी पुरेसे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
आमचे कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभे राहावे
गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते. जरी विरोधी पक्षात असलो, तरी राजकीय समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभे राहावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडला. त्याआधीपासून आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. सरकार कितीही घटनाबाह्य असले, तरी सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.
दरम्यान, या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत. महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवे. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"